जळगाव समाचार | १८ मे २०२६
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, सोमवारी (दि. १८ मे) होणाऱ्या निवड प्रक्रियेमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. तत्कालीन सभापती सुनील महाजन यांच्या विरोधात तब्बल १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी विविध स्तरावर जोरदार राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
सभापतीपदाच्या निवडीपूर्वी शुक्रवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपच्या दहा संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करण्याचेही ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याचे बोलले जात असले तरी सभापतीपदासाठी अंतिम नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
दरम्यान, सभापतीपदासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी सध्या मुख्य स्पर्धा लक्ष्मण पाटील आणि मनोज चौधरी यांच्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या दोघांपैकी एकाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भाजपकडून ऐनवेळी राजकीय रणनीती आखत तिसऱ्याच एखाद्या संचालकाला संधी दिली जाणार का, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.
सोमवारी सकाळी निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींकडून अधिकृत नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
![]()






