कासमवाडी परिसरात तरुणाची तलवार-कोयत्याने हत्या

जळगाव समाचार | ३ ऑक्टोबर २०२५

शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (३ ऑक्टोबर) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील (वय २७, रा. कासमवाडी) असे मयत तरुणाचे नाव असून त्याच्या पोटावर आणि पायावर तलवार व कोयत्याने वार करून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटील याचा परिसरातील काही तरुणांसोबत जुना वाद होता. शुक्रवारी मध्यरात्री तो एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना दोन जणांनी अचानक तलवार व कोयत्याने त्याच्यावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईक व उपस्थित नागरिकांनी रुग्णालयात आक्रोश व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड आणि पीएसआय चंद्रकांत धनके यांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here