कालिका माता मंदिरासमोरील सिग्नल कार्यान्वित, पण वाहतुकीच्या शिस्तीकडे दुर्लक्ष…

 

जळगाव समाचार | ४ मार्च २०२५

जानेवारी महिन्यात कालिका माता मंदिरासमोर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली येऊन एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर प्रशासनाने सिग्नल कार्यान्वित केला, मात्र अद्यापही वाहतूक शिस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.

कालिका माता मंदिरासमोरील चौकातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. जळगावहून भुसावळकडे आणि जुन्या जळगावकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी रहदारी असते. सिग्नल बसवल्यानंतरही अनेक वाहनधारक सिग्नल न पाळता वाहने चालवत आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि लहान वाहनधारक नियम धाब्यावर बसवून आपल्या सोयीनुसार रस्ता ओलांडत असल्याचे चित्र दिसत आहे.

मंदिरासमोर व्यवसाय करणारे विक्रेते तसेच प्रवासी मोठ्या संख्येने थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहने पार्क करून प्रवासी रस्त्यावर थांबत असल्याने संभाव्य अपघात होण्याची शक्यता आहे.

सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस तैनात असणे गरजेचे होते. मात्र, या ठिकाणी पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष जाणवत असून वाहनधारक मनमानीपणे वाहने चालवत आहेत.

यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले,
“सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. अतिक्रमणाचा विषय महानगरपालिकेचा असून, सकाळी किंवा सायंकाळी कर्मचारी नियुक्त केला जाईल.”

सिग्नल कार्यान्वित होऊनही वाहतूक शिस्तीचा अभाव असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here