जळगाव समाचार | १३ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरातील कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता भरधाव डंपरने धडक दिल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या भीषण अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७, रा. जुने जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे बाजारातून भाजीपाला घेऊन घरी परतत असताना कालिंका माता चौकातून जाताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचे चाक थेट त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातावेळी डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.
घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली आणि वातावरण तणावपूर्ण झाले. गेल्या वर्षी याच चौकात एका चिमुकल्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अपघात घडल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त डंपरवर दगडफेक करत काचा फोडून तोडफोड केली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन दंगा नियंत्रण पथकासह शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कालिंका माता चौक हा अपघातप्रवण भाग बनत चालल्याने येथे तातडीने अद्ययावत सिग्नल व्यवस्था सुरू करावी आणि २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

![]()




