जळगाव समाचार | स्पोर्ट्स डेस्क
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, टीम इंडियाला वनडे स्वरूपातही नवा कर्णधार मिळाला आहे. कसोटीतील निवृत्तीनंतर रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलला वनडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र, रोहित संघात असतानाही गिलला कर्णधार बनवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या निवड समितीने घेतल्याने माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कैफने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे, “रोहित शर्माने भारतीय क्रिकेटसाठी १६ वर्ष दिली, पण आपण त्याला अजून एक वर्ष देऊ शकलो नाही. २०२३ च्या वनडे वर्ल्डकप फायनलचा अपवाद वगळता, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने १६ पैकी १५ सामने जिंकले. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली आणि त्या फायनलमध्ये तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. इतक्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही त्याच्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष झाले, हे खेदजनक आहे.”
कैफने पुढे म्हटले की, “आपल्याकडे ‘चालतंय तोवर चालवायचं’ अशी परंपरा आहे, पण रोहित तसं वागला नाही. टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी म्हणून स्वतःहून निवृत्ती घेतली. प्रकाशझोतातून बाजूला होत तो इतरांना संधी देणारा नेता ठरला. पण अशा माणसाला वनडेत आणखी एक वर्षाची संधी न देणं योग्य ठरू शकत नाही.”
त्याचबरोबर कैफने बीसीसीआयच्या घाईगडबडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “ज्या रोहित शर्माने अवघ्या आठ महिन्यांत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या, त्यालाच बाजूला करून गिलकडे नेतृत्व सोपवणं म्हणजे ‘छप्पर फाड के प्रमोशन’ आहे. गिलमध्ये क्षमता आहे, पण त्याच्याकडे अजून वेळ होता,” असं तो म्हणाला.
रोहित-विराट युग संपत चालल्याच्या चर्चेत हा निर्णय अधिकच वादग्रस्त ठरत आहे. कैफच्या मतानुसार, “ही वेळ रोहितची होती, त्याला योग्य सन्मान आणि विश्वास देणे अपेक्षित होते.” ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गिल कसा प्रदर्शन करतो आणि बीसीसीआयच्या या निर्णयाचं भविष्यात काय परिणाम दिसतील, हे पाहणं आता क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.