Monday, December 23, 2024
Homeजळगावजयश्रीताईंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांना शहरात रोजगारनिर्मितीचे दिले आश्वासन

जयश्रीताईंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांना शहरात रोजगारनिर्मितीचे दिले आश्वासन

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला आता वेग धरला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देत असून, प्रचाराच्या फेऱ्यांना होणारी गर्दी पाहता जयश्री महाजन यांच्या प्रचाराने आता शहरातील नागरिकांवर प्रभाव पाडायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
(दि.८) दुपारी ३ वाजता जयश्री महाजन यांनी शहरातील कलिंकामाता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. शहर विकासाच्या आपल्या प्रयत्नाना यश देण्याचे देवीला साकडे घालून, त्यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात केली. यावेळी उपस्थित महिलांसह वयोवृद्धांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे प्रचार फेरीची सुरुवातच जोशपूर्ण वातावरणात झाली.
प्रभाग क्रमांक १७ मधील हॅप्पी होम कॉलनी, रामचंद्र नगर, दत्त मंदीर परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, श्रीराम मंदीर परिसर, बालाजी मंदीर, गौरव हॉटेलमागील परिसर, सिध्दीविनायक शाळेजवळील परिसर, हनुमान नगर, म्हाडा कॉलनी या मार्गे रेमंड कॉलनीत प्रचार फेरीचा समारोप झाला. या दरम्यान जयश्री महाजन यांनी हॅप्पी होम कॉलनीत नागरिकांना भेटून संवाद साधला. या ठिकाणी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी जयश्री महाजन यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अयोध्यानगरातगी नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी समर्थनार्थ घोषणा देत लोकांनी जयश्री महाजन यांना पाठींबा दिला.
*तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर दिले आश्वासन*
या प्रचार सभेदरम्यान जयश्री महाजन यांनी परिसरातील तरुणांशी संवाद साधताना, रोजगाराच्या मुद्द्याला विशेष प्राधान्य दिले. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, आपल्या शहरातील अनेक युवकांना दुसऱ्या शहरात जाऊन नोकरीसाठी धडपड करावी लागते आणि त्यामुळे कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते, ही परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. मी निवडून आल्यास तरुणांच्या रोजगारासाठी प्रभावी उपाययोजना करेन व जळगावातील तरुणांना शहरातच रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.

जयश्री महाजन यांच्या या प्रचार मोहिमेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. जयश्री महाजन यांच्या प्रचारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे संचार झाले असून, त्यांनी एकजुटीने प्रचारात झोकून दिल्याने, ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जयश्री महाजन यांनी जाहीर केलेल्या आश्वासनांमुळे जळगाव शहरातील नागरिकांसाठी एक आशावादी वातावरण निर्माण होत असून, हीच आशा आता ऊर्जा बनून येत्या निवडणुकीत जयश्री महाजन यांना एक सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आणेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page