जळगाव समाचार डेस्क | २२ जानेवारी २०२५
जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे अनेक प्रवाशांनी गोंधळात धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडल्याने मोठा अपघात घडला.
पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना, ट्रेनच्या ब्रेकमुळे चाकांमधून ठिणग्या उडाल्या. ठिणग्या पाहून काही प्रवाशांनी आग लागल्याचा संशय व्यक्त केला, ज्यामुळे अफवा पसरली की ट्रेनला आग लागली आहे. त्यामुळे सुमारे 30-35 प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने हॉर्न न वाजवता या प्रवाशांना चिरडले.
या भीषण अपघातात 6-7 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मृतांचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
अपघातग्रस्त पुष्पक एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाने सांगितले की, “दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची अफवा पसरली आणि गोंधळात काही जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. याचवेळी बंगळुरू एक्स्प्रेस आली आणि हा अपघात झाला.” काही प्रवाशांनी बंगळुरू एक्स्प्रेसचा हॉर्न वाजवला गेला नसल्याचा दावा केला आहे.
पुष्पक एक्स्प्रेसला पाचोरा स्थानकात थांबवण्यात आले आहे. प्रशासनाने घटनास्थळी तपास सुरू केला असून अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

![]()




