जळगाव समाचार डेस्क| ३१ जुलै २०२४
सुवर्णनगरी जळगावातील (Jalgaon) राजमल लखीचंद ज्वेलर्स हे राज्यासहित भारतात प्रख्यात आहे. मात्र आता हे अनेक राजकीय आणि वादाच्या कारणानेही प्रसिद्धीझोतात आले आहे. त्याचे कारण आहे नागपूर विशेष न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवरून मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र मनीष जैन यांच्या विरोधात चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जैन पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सक्तीवसुली संचलनालय ( ईडीने) नागपुरच्या विशेष पीएमएलए कोर्टात २६ जून रोजी मे. राजमल लखीचंद प्रा. लि.; आर. एल. ज्वेल्स व मानराज ज्वेल्स प्रा. लि. या फर्मच्या माध्यमातून केलेले व्यवहार संशयास्पद वाटत असल्याने तक्रार दाखल केली होती. यावरील सुनावणीत न्यायालयाने पीएमएलए कायद्याच्या अर्थात मनी लॉंड्रींगच्या अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
ईडीने गेल्या वर्षी १७ ऑगस्ट २०२३ रोजी आर.एल. समूहातील फर्म्सवर छापेमारी केली होती. यात सोने-चांदीच्या दागिन्यांसह अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांनी स्टेट बँकेकडून साडेतीनशे कोटीचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची रक्कम ही इतरत्र वळविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. याबाबत स्टेट बँकेने आधी सीबीआयकडे तक्रार केली होती. नंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले असून हा खटला न्यायालयात सुरू झालेला आहे.याप्रकरणी अधिक तपासातून संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने ईश्वरलाल जैन व मनीष जैन यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

![]()




