जळगाव समाचार | २४ सप्टेंबर २०२५
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस (अप गट) चे पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख यांना मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. तीन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून शहरात खळबळ उडाली आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी व्यावसायिक मनोज वाणी यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी देशमुख यांच्यावर दरोडा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा 12 नोव्हेंबर 2022 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.
तपासाच्या अनुषंगाने 23 सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात व्यावसायिक मनोज वाणी यांनी देशमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करीत फसवणूक व पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला होता. तीन वर्षांच्या कालावधीनंतर अखेर देशमुख यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यात आली आहे.