जळगाव समाचार | १३ नोव्हेंबर २०२५
शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन अर्थात सुप्रसिद्ध लेवा भवन येथे सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय उघडण्यात आले असून, या घडामोडीमुळे शहरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. हे कार्यालय माजी महापौर व शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले असल्याचे समजते. भंगाळे यांनी या उद्घाटनाचा व्हिडिओ आणि माहिती स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध केल्याने या विषयावर चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांचे पुत्र ॲड. पियुष नरेंद्र पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की सरदार वल्लभभाई पटेल भवन ही महानगरपालिकेच्या मालकीची जागा असून ती संबंधित संस्थेला केवळ करारावर देण्यात आलेली आहे. करारातील अटींनुसार, ही जागा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी वापरली जाणार नाही, असे स्पष्टपणे नमूद आहे. मात्र, या अटींचे उल्लंघन करून सत्ताधारी पक्षाने कार्यालय सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या संदर्भात ॲड. पाटील यांनी मनपा अतिक्रमण विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून हे अनधिकृत कार्यालय जप्त करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा करारावर दिलेल्या जागांचा अशा प्रकारे राजकीय उपयोग होऊ नये यासाठी कठोर कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्ती मानले जात असल्याने या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, मनपा प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

![]()




