जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; खून प्रकरणातील फरार आरोपी अटकेत, त्याच्याकडून अवैध शस्त्रसाठा जप्त…


जळगाव समाचार | २४ मार्च २०२६

शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार मुख्य संशयिताला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि आठ तलवारींसह मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त केला असून शहरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक गोपाल देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित धीरज उर्फ धनंजय दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव) हा अनेक दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध सुरू असताना तो जळगाव शहरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहरात गस्त वाढवून आर.आर. शाळेजवळ सापळा रचला.

या ठिकाणी दोन संशयित दुचाकीवरून जात असताना त्यांना अडवून चौकशी करण्यात आली असता त्यांनी आपली ओळख धीरज उर्फ धनंजय कोळी आणि अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) अशी दिली. तपासात धीरज कोळी हा खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत झडती घेतली असता सुमारे १५ हजार रुपये किमतीची दुचाकी, ६० हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे आणि ४० हजार रुपये किमतीच्या आठ तलवारी असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या शस्त्रांचा वापर पुढील गुन्ह्यांसाठी केला जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. धीरज कोळी याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत नशिराबाद पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक करत त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. नशिराबाद) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष कोबिंग ऑपरेशनदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना चेतन पाटील हा बसस्थानक परिसरात गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक अस्सल गावठी कट्टा आणि एक बनावट कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या सलग कारवायांमुळे जळगाव शहर आणि परिसरातील गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here