जळगाव समाचार | ८ जुलै २०२६
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि जळगाव जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जळगाव पोलीस मुख्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत पोलीस मुख्यालयाच्या परिसरात एकूण २,३२० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, केवळ वृक्षारोपण करून न थांबता त्यांचे संगोपन व संवर्धन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या अभियानात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे ५५० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्यांच्या श्रमदानातून पोलीस मुख्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची नियोजनबद्ध लागवड करण्यात आली. तसेच या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यात आला.
या वृक्षारोपण कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक (गृह शाखा) संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व श्री सदस्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला हातभार लावला.

![]()




