जळगाव समाचार | १४ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहर पोलिसांनी आज (१४ नोव्हेंबर) पहाटे एक धडक ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून तब्बल १०४ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली पहाटे ४ ते ७ या तीन तासांच्या कालावधीत झालेल्या या कारवाईत शहर, एमआयडीसी, शनिपेठ आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्यानंतर ही धडक मोहीम आखण्यात आली होती.
या सर्वसमावेशक कारवाईत LCB प्रमुख पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसीचे निरीक्षक बबन आव्हाड, रामानंद नगरचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शनिपेठचे निरीक्षक कावेरी कमलाकर आणि शहर पोलीस स्टेशनचे API सुरेश आव्हाड यांसह मोठा पोलीस फौजफाटा सहभागी होता. पहाटे ४ वाजता सर्व पथकांनी समन्वयाने गुन्हेगारांच्या वस्त्या, निवासस्थाने आणि संभाव्य अड्ड्यांवर छापे घालत त्यांना झोपेतूनच ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या कॉम्बिंग ऑपरेशनचा उद्देश रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सध्याची स्थिती तपासणे आणि त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करणे हा होता.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व १०४ जणांना सकाळी जिल्हा पेठ परिसरातील मोकळ्या मैदानात एकत्र आणून त्यांची ‘परेड’ घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी कठोर शब्दांत चेतावणी देताना, “यापुढे शहरातील शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला किंवा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभाग आढळल्यास थेट तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली जाईल,” असा स्पष्ट इशारा दिला. परेडदरम्यान सर्व आरोपींकडून समजपत्रे लिहून घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
या अचानक, सुनियोजित आणि व्यापक कारवाईमुळे जळगावातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राबवलेली ही मोहिम प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंगचे प्रभावी उदाहरण म्हणून पाहिली जात आहे. पोलिसांच्या या पावलामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

![]()




