जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज; अहमदाबाद मार्गावरही उड्डाणे सुरू

जळगाव समाचार | २२ ऑक्टोबर २०२५

जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा आता २६ ऑक्टोबरपासून दररोज सुरू होणार आहे. ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून उडान योजनेअंतर्गत ही सेवा दिली जात आहे. आतापर्यंत रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी ही विमानसेवा चालू होती. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर कंपनीने दररोज उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडे व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय कारणांसाठी जाणाऱ्यांना आता केवळ दीड तासांत मुंबई गाठणे शक्य होणार आहे.

प्राप्त वेळापत्रकानुसार, मुंबई विमानतळावरून सायंकाळी ७:१० वाजता विमान उड्डाण घेऊन रात्री ८:२५ वाजता जळगावला पोहोचेल, तर जळगावहून मुंबईसाठी रात्री ८:५० वाजता उड्डाण घेऊन १०:१० वाजता मुंबईत पोहोचेल. याशिवाय, दोन महिन्यांपासून बंद असलेली जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस — रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार — उपलब्ध असेल. जळगावहून सायंकाळी ७:२० वाजता विमान अहमदाबादकडे निघेल, तर अहमदाबादहून दुपारी ५:४० वाजता उड्डाण घेऊन सायंकाळी ६:५५ वाजता जळगावला पोहोचेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here