जळगाव समाचार | १६ नोव्हेंबर २०२५
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत झालेल्या गंभीर त्रुटीनंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने सुधारित सोडतीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (ता. 11) झालेल्या एकोणीस प्रभागांच्या सोडतीनंतरच हा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात आला होता. मात्र मागासवर्गीय महिलांच्या ‘अ’ श्रेणीतील प्रभागांचाच विचार होऊन ‘ब’ श्रेणीचे प्रभाग सोडून देण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर आयोगाने सोडतच अवैध ठरवत पुन्हा प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
शासनाने २० मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमांनुसार, १३ प्रभागांतील एकूण ५ मागासवर्गीय महिला जागांसाठी नवी सोडत काढण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने जारी केले असून, नियम ६(४) नुसार सर्वसाधारण महिलांच्या जागांचीही पुनर्नियोजन प्रक्रिया एकाचवेळी पार पाडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या घडामोडीमुळे जळगावच्या राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ माजली आहे. आधीच्या सोडतीनुसार तयारीला लागलेले अनेक इच्छुक आता गोंधळलेल्या अवस्थेत असून, “आपला प्रभाग आरक्षणात येणार का?” या प्रश्नाने त्यांची धाकधूक वाढली आहे. विशेषतः मागासवर्गीय महिलांचे आरक्षण बदलल्यास काही उमेदवारांचे संपूर्ण गणितच बिघडू शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे.
नागरिकांच्याही नजरा आता सोमवारी (ता. 17) होणाऱ्या सुधारित सोडतीवर खिळल्या आहेत. प्रभागातील प्रतिनिधित्व कोण करणार? कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणाचे नुकसान? — या प्रश्नांनीच वातावरण तापले आहे. स्थानिक स्तरावर उमेदवारांची धावपळ वाढत असून प्रत्येकजण आपल्या प्रभागातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, शहरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, “आरक्षण बदलाचा कोणाला फटका बसणार?”, “सोडत कोणाला उभारी देणार?” यावर तर्क-वितर्क सुरूच आहेत. नवी सोडत येईपर्यंत राजकीय वातावरणात प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला आहे.

![]()




