जळगाव महापालिका निवडणूक : उद्या जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो…

 

जळगाव समाचार | ५ जानेवारी २०२५

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णायक आघाडी मिळवण्याच्या उद्देशाने महायुतीने प्रचाराची धार अधिक तीव्र केली असून, या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमुळे महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळणार असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.

दुपारी ठीक ३ वाजता हा रोड शो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार असून, नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच त्याचा समारोप होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत. व्यापारी, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये या रोड शोबाबत मोठी उत्सुकता असून, मार्गावर विविध ठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी महायुतीच्या माध्यमातून एकत्र येत ताकद दाखवली आहे. या रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असून, जळगाव शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here