जळगाव समाचार | २४ डिसेंबर २०२५
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून पंकज बोरोले यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, बोरोले यांच्या नावामुळे प्रभागातील राजकीय समीकरणेही बदलताना दिसत आहेत. पंकज बोरोले हे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचे निकटवर्तीय असून त्यांचे खंदे समर्थक आहेत.
एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले पंकज बोरोले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निष्ठेने काम केले आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम, जनहिताच्या कामांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मते गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून प्रभागात नेतृत्वात फारसा बदल न झाल्यामुळे मूलभूत सुविधा, नियोजनबद्ध विकास आणि नागरिकाभिमुख कामे अपेक्षित गतीने होऊ शकली नाहीत. त्यामुळे यावेळी नव्या विचारांचे, ऊर्जावान आणि जबाबदार नेतृत्व आवश्यक असल्याची भावना ते व्यक्त करीत आहेत.
उमेदवारी मिळाल्यास प्रभाग क्रमांक १६ च्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध आराखडा राबविण्याचा निर्धार बोरोले यांनी व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा, युवकांसाठी क्रीडा सुविधा, महिलांसाठी सुरक्षिततेचे उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा या मुद्द्यांवर ते विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “फक्त आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्षात दिसणारा विकास” हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
पंकज बोरोले यांची सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण उपस्थिती, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अंतिम उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार असून, निवडणूक लढतीला खरी रंगत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

![]()




