जळगाव महापालिकेसाठी भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती ठरली; अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र बाहेर ?

 

जळगाव समाचार | २४ डिसेंबर २०२५

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर सर्वात महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या युतीबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावच्या विकासासाठी ही युती निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

बुधवारी जळगाव एमआयडीसी परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिताताई वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर युती होणार की नाही, याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, महायुतीतील तिसरा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या सहभागाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन जळगाव महानगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकवण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here