जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२६
गणेशोत्सवाच्या उत्साहात शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौक परिसरात २८ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलासह गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. हेमांगिनी निखील महाजन आणि त्यांचा मुलगा शौर्य अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमांगिनी महाजन या सोमवारी दुपारी मुलगा शौर्यसह घरात होत्या. महाजन कुटुंबीय तळेले कॉलनी परिसरात राहते. निखील महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे कर्तव्यावर आहेत. घराच्या तळमजल्यावर निखील महाजन यांचे कुटुंब, तर पहिल्या मजल्यावर त्यांचे बंधू अक्षय महाजन राहतात.
सायंकाळच्या सुमारास निखील यांच्या आई खाली आल्या असता घराचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर दरवाजा उघडला असता हेमांगिनी आणि शौर्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. महाजन कुटुंबीय परिसरात परिचित असल्याने घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
![]()






