Friday, January 10, 2025
Homeजळगावकेळी उत्पादकांनी फसवणुक टाळण्यासाठी अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

केळी उत्पादकांनी फसवणुक टाळण्यासाठी अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

जळगाव समाचार डेस्क| ३० जुलै २०२४

केळी उत्पादक शेतकरी यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापारी यांच्याशीच विक्रीचा व्यवहार करावा तसेच बाजार समितीने सुध्दा नवीन व्यापारी केळीच्या व्यापारात येतील यासाठी प्रयत्न करावेत बाजार समितीने परवाना देण्याची पारंपारीक पध्दतील बदल करुन शेतक-यांची फसवणुक होवु नये यासाठी व्यापारी परवाना देतांना परवाना मागणा-या व्यक्तीचे पोलीस व्हेरीफीकेशन तसेच सदर व्यक्तीच्या सिबील स्कोअर्स तपासावे व सदर व्यक्तीच्या व्यवहार करण्याच्या आर्थिक क्षमतेनुसार त्याच्याकडुन अनामत किंवा बँक ग्रॅरंटी घेण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बाजार समितीस केल्या.
कृषि उत्पन्न बाजार समिती, रावेर यांच्या माध्यमातुन आज दिनांक ३०/०७/२०२४ रोजी रावेर येथे केळी लिलाव व स्थिरभावा संदर्भात चर्चा सत्र आयोजित केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक, गौतम बलसाणे यांच्यासह यावल, रावेर, बोदवड, जामनेर, चोपडा या बाजार समितीचे संचालक व परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या चर्चासत्रामध्ये जिल्हाधिकारी यांनी उपस्थित शेतकरी व व्यापारी यांच्याशी थेट संवाद साधला व केळी उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी समजुन घेतल्या. तसेच केळीच्या पिकास स्थिरभाव मिळण्यासाठी दिर्घकालीन तसेच कमीकालावधीच्या अशा दोन प्रकारच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दिर्घकालीन उपाय योजनेमध्ये शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणंद रस्ते तयार करणे, केळी वाहतुकीसाठी रेल्वे वॅगन उपलब्ध करुन देणे तसेच जिल्हयातील केळी उत्पादक शेतकरी यांनी केळीच्या एकाच वाणाची पेरणी न करता केळीचे वेगवेगळया प्रकारच्या वाणांची लागवड करावी असे सांगितले. तसेच केळीवर आधारीत इतर प्रक्रिया उदयोग उभारण्याचे आवाहन केले. बाजार समितीने परवाना धारक व्यापारी यांची माहिती शेतक-यांना होण्यासाठी परवाना धारक व्यापारी याची नावे जाहीर करावीत तसेच त्यांना ओळखपत्र दयावे असे सुचविले.
जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील परवाना देणे बाबतच्या कार्यपध्दतीची माहिती उपस्थित व्यापारी व बाजार समिती सदस्य यांना समजावून सांगितली व बाजार समितीने परवाना देतांना व्यापा-याकडुन त्यांच्या व्यवहाराच्या स्वरुपानुसार बॅक ग्रॅरंटी घेणे बाबत यापुढे दक्षता घ्यावी असे आवाहन केले.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page

Jalgaon Samachar WhatsApp Group