जळगाव समाचार | २३ सप्टेंबर २०२५
जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत गेल्या आठवड्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यापैकी मुक्ताईनगर तालुक्यातील एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात १५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील एक शेतकरी नाल्याच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याचबरोबर पाचोरा तालुक्यातील २०० पेक्षा अधिक जनावरे आणि ट्रॅक्टर्सही पुरात वाहून गेले. जामनेर तालुक्यात तीन जनावरे मृत्युमुखी पडली. नद्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा आर्थिक आणि जीवितसंबंधी धोका निर्माण झाला. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, अहवालानुसार ७७ गावांतील १४ हजारांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले असून ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील किरण सावळे (२८) यांचा १५ तारखेला नाल्याच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यांच्या कुटुंबियांना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील आबा पिंगळे (३५) यांचा गुरुवारी गावालगतच्या नदीत पाय घसरल्याने बेपत्ता होऊन दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांचा मृतदेह सापडला.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील लक्ष्मण ठाकरे (३०) हे शुक्रवारी वाघूर नदीवर म्हशी धुण्यासाठी गेले असताना पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेह गावापासून चार किलोमीटर अंतरावर जोगलखेडा शिवारात शनिवारी सकाळी आढळला. तसेच वडगाव टेक येथील नीता भालेराव (१४) ही मुलगी हिवरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह रविवारी परधाडे शिवारात सापडला. वरखेडी (ता. पाचोरा) येथील सतीश चौधरी (३५) हे शेतातून येताना नाल्याच्या पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा मृतदेह गावालगतच सोमवारी आढळला.
जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प आता तुडुंब भरले असून काही प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे बहुतेक नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत नदी काठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.