जळगाव समाचार | १९ डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात काशीबाई कोल्हे विद्यालयाजवळ व स्टेट बँकेसमोरील काही दुकानांना शुक्रवारी पहाटे सुमारे चारच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. पहाटेच्या शांत वातावरणात आग भडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या आगीत चार दुकाने पूर्णतः जळून खाक झाली असून संबंधित दुकानदारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये गणेश राणे यांचे व्हीनस ऑप्टिकल, पुष्पक खडके यांचे भगवती ऑटोमोबाईल, भूषण वाघुळदे यांचे श्री विघ्नहर्ता स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसेस तसेच प्रदीप खडके यांचे सखी मॅचिंग सेंटर यांचा समावेश आहे. आगीमुळे सर्व दुकानांमधील साहित्य, मालसाठा व महत्त्वाची कागदपत्रे पूर्णतः जळून खाक झाली आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता इतकी होती की दुकानांच्या मागील बाजूस उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा उष्णतेमुळे फुटल्या. सुदैवाने दुकाने बंद असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे भगवती ऑटोमोबाईलचे मालक पुष्पक खडके यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वीच नव्या व्यवसायाची सुरुवात केली होती. पहिल्याच आठवड्यात दुकान आगीत भस्मसात झाल्याने त्यांच्यासह इतर दुकानदारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शेजारील खाद्यपदार्थाच्या दुकानातील गॅस सिलेंडर सुरक्षित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर आमदार सुरेश भोळे व माजी नगरसेवक वीरण खडके यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्तांची पाहणी केली असून, प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

![]()




