जळगाव समाचार | १२ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरातील एका प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटला घरातील वॉशिंग मशीन दुरुस्तीचा प्रयत्न करताना तब्बल ₹४,६४,४३९ रुपयांचा फटका बसला आहे. गूगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधणे त्यांना चांगलेच महागात पडले.
निलेश हेमराज सराफ (वय ४९, रा. अजय कॉलनी, रिंग रोड, जळगाव) हे प्लॉट खरेदी-विक्री व्यवसाय करतात. त्यांच्या घरातील वॉशिंग मशीन अचानक खराब झाल्याने त्यांनी ऑनलाईन गूगलवर “कस्टमर केअर सेंटर”चा नंबर शोधला. संबंधित नंबरवर संपर्क साधल्यानंतर एका व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअॅपवर एक APK फाईल पाठवली.
निलेश सराफ यांनी ती फाईल उघडल्यावर ती ऑटो डाउनलोड झाली आणि काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून ₹४,६४,४३९ रुपये ऑनलाईन काढण्यात आले. फसवणुकीची जाणीव होताच त्यांनी तत्काळ जळगाव सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सायबर गुन्ह्याचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.