जळगाव समाचार | ३१ डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील प्रतिष्ठित गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी सुमारे २ वाजता जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत साई गणेश बोराडे (वय १८, रा. शंकरराव नगर, जळगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साई बोराडे हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमा शिक्षण घेत असून तो कुटुंबासह शंकरराव नगर येथे वास्तव्यास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) याच्याशी साई बोराडे यांचे यापूर्वीपासून वाद होते. बुधवारी सकाळीही किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. दुपारी साई बोराडे गोलाणी मार्केट परिसरात आला असता, तेथे शुभम सोनवणे याने त्याला पाहून अचानक चाकू काढत उजव्या व डाव्या बाजूला वार केले. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मोबाईलच्या कामानिमित्त घटनास्थळी उपस्थित असलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस हवालदार रमेश बाबुलाल चौधरी यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेऊन हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टाळला. जखमी साई बोराडे याला नागरिकांच्या मदतीने प्रथम शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. साई बोराडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस हवालदार रमेश चौधरी यांच्या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

![]()




