जळगाव शहरात घरफोडी प्रकरण उघड; चौघा चोरट्यांना अटक

 

जळगाव समाचार | २७ सप्टेंबर २०२५

जळगाव शहरात व जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशाच एका घरफोडी प्रकरणाचा छडा लावत रामानंद नगर पोलिसांनी चौघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. चोरट्यांकडून तब्बल ३१० ग्रॅम सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदी आणि इतर मुद्देमाल मिळून ३६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे इतर दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहाडी रोड, पार्वतीबाई काळे नगर येथील नरेंद्र बाध हे बाहेरगावी असताना १५ मे ते १ जून या कालावधीत त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. यामध्ये ३५७ ग्रॅम सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदी, ८५ हजार रुपये रोख तसेच डीव्हीआर, वायफाय मॉडेल असा एकूण ३६ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी १ जून रोजी लिलाधर शांताराम खंबायत यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान, १९ सप्टेंबर रोजी रात्री गस्तीवर असताना पोलिसांनी दोन संशयितांना पकडले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांची नावे रवि प्रकाश चव्हाण (२१, रा. तांबापूरा) व शेख शकील शेख रफीक (३०, रा. रामनीगंज) अशी आहेत. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या साथीदारांना जनंद उर्फ मस्तकीम भिकन शहा व गुरुदयालसिंग मनजित टाक यांनाही २० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

आरोपींनी चोरी केलेले दागिने सुरत आणि जामनेर येथे विकल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे ३३ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल, ज्यामध्ये ३१० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २५० ग्रॅम चांदीचा समावेश आहे, असा ऐवज जप्त केला. या यशस्वी कारवाईमुळे रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या इतर दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here