जळगाव समाचार | २८ मार्च २०२६
राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई येथील मलबार हिल परिसरातील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष समारंभात प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
२८ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील जिल्ह्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले होते. भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सखोल आणि सर्वंकष मूल्यांकनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीची दखल या माध्यमातून घेण्यात आली.
या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन संकेतस्थळाचे अद्ययावत आणि वापरकर्त्यांसाठी सुलभ स्वरूप, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर, कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विकसित केलेले डॅशबोर्ड, नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणालीचा प्रभावी उपयोग या निकषांवर जळगाव जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केले. या उपक्रमांमुळे ‘Ease of Living’ आणि ‘Ease of Working’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने जळगाव जिल्ह्याने टाकलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होऊन सेवा अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“हे यश जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे व समन्वयाचे फळ आहे. जिल्हा प्रशासनाचे हे यश समस्त जळगावकर नागरिकांना समर्पित आहे. ”
— श्री. रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव

![]()




