नेपाळमध्ये भाविकांची बस नदीत कोसळून १४ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये जिल्ह्यातील अनेकांचा सामावेश…

जळगाव समाचार डेस्क। २३ ऑगस्ट २०२४:

महाराष्ट्रातील भाविकांना देवदर्शनासाठी घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची एक बस नेपाळमध्ये भीषण अपघातग्रस्त झाली आहे. शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता तनहुन जिल्ह्यातील खोल नदीत बस कोसळल्याने १४ भाविकांनी आपला जीव गमावला असून, ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पाच जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त बस उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून भाविकांना घेऊन नेपाळच्या पोखराहून काठमांडूला जात होती. प्रवासादरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती खोल नदीत कोसळली. यामुळे झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. बसमधील बहुतांश भाविक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.

या दुर्घटनेनंतर जळगावचे जिल्हाधिकारी यूपीतील महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून, मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देखील समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सतत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

नेपाळ प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले असून, सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनीही अपघाताबाबत चिंता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here