जळगाव समाचार | ११ डिसेंबर २०२५
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी हिवाळी अधिवेशनात जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ठळकपणे मांडला. देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावची ओळख असली, तरी अनिश्चित हवामान, ओलावृष्टि, उच्च आर्द्रता आणि अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत आहे. सद्याच्या फळस्वर व हवामान आधारित विमा योजनेत ओलावृष्टि जोखीम कालावधी १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना पुरेसा दिलासा मिळत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्षात मे महिन्याच्या अखेरपर्यंत ६०% पेक्षा जास्त आर्द्रता, सलग ३-४ दिवसांचा पाऊस आणि प्रतिकूल हवामान परिस्थिती कायम राहते, ज्याचा थेट परिणाम केळी पिकांच्या वाढीवर, गुणवत्तेवर आणि उत्पादनावर होतो, असे कृषी विभागाच्या अहवालात आणि स्थानिक हवामान केंद्राच्या आकडेवारीत नमूद आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे केवळ नोंदवलेल्या कालावधीपुरते नसून प्रत्यक्ष परिस्थिती जास्त गंभीर असल्याचे वाघ यांनी सभागृहात मांडले.
या पार्श्वभूमीवर विमा जोखीम कालावधी ३१ मेपर्यंत वाढवावा आणि सलग अनेक दिवस टिकणाऱ्या प्रतिकूल वातावरणीय बदलांनाही विमा कव्हरमध्ये समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी खा. वाघ यांनी केंद्र सरकारकडे केली. या निर्णयामुळे जळगावसह राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल आणि त्यांच्या मेहनतीला योग्य सुरक्षा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

![]()




