जळगाव विमानतळाचा विकास वेगाने; केंद्राकडून ३० कोटींच्या निधीला मंजुरी खा. स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश – टर्मिनल, ॲप्रन, कार्गो टर्मिनल आदी विकासकामांना गती

जळगाव समाचार | ४ नोव्हेंबर २०२५

शहरातील विमानतळाला राज्यातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळाचा मान मिळाला आहे. विमानतळावरील सेवा अधिक सक्षम आणि गतीमान करण्यासाठी केंद्र सरकारकडे तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्याची मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने सुमारे ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, या निधीतून पुढील वर्षभरात विविध विकासकामांना गती मिळणार आहे.

सध्या जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू आहे. उडान योजनेंतर्गत प्रवाशांकडून मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे जळगाव-मुंबई विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून बंद असलेली जळगाव-अहमदाबाद सेवा देखील पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, फ्लाय ९१ या कंपनीने जळगावहून सकाळच्या वेळेत पुणे आणि गोवा या शहरांसाठी नवीन फ्लाइट सेवा सुरू करण्यासाठी मागणी केली आहे.

या निधीतून दोन एटीआर-७२ आणि एक लेगसी-६५० विमानांची पार्किंग होऊ शकेल, अशा ॲप्रनचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच आधुनिक सुविधांनी सज्ज टर्मिनल इमारत, १५० प्रवाशांची बैठक व्यवस्था, १०० मोटारींसाठी वाहनतळ, कन्व्हेयर बेल्टसह आगमन सभागृह, वैद्यकीय तपासणी कक्ष, अतिरिक्त चेक-इन काऊंटर, खाद्यपदार्थांची दुकाने आणि बालसंगोपन कक्षाची उभारणी होणार आहे. या विकासकामांमुळे विमानतळाची क्षमता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.

खासदार वाघ यांनी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवून विमानसेवेच्या फेऱ्या वाढवण्याची तसेच विमानतळाची एकूण क्षमता वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. जळगावसारख्या वाढत्या शहराला सक्षम विमानसेवा मिळाल्यास नवीन गुंतवणूकदारांना आकर्षण मिळेल आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर केला आहे.

याशिवाय, जळगाव विमानतळावर स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) टर्मिनल सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या कृषी उडान योजना अंतर्गत देशभरातील ५८ विमानतळांचा समावेश करण्यात आला असून, त्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि जळगाव या विमानतळांचाही समावेश आहे. कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीमाल निर्यात करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

दरम्यान, नवी दिल्ली आणि इंदूर शहरांना जळगावशी हवाई मार्गाने जोडण्यासाठी इंडीगो आणि स्टार एअर या कंपन्यांकडून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. खासदार स्मिता वाघ यांनी या संदर्भात केंद्रीय नागरी विमानन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असून, लवकरच या दोन्ही शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीसाठी सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना देशाच्या राजधानीला अल्प वेळात पोहोचणे शक्य होईल. तसेच गोवा, पुणे आणि हैदराबादसाठी सकाळच्या फ्लाइट सुरू झाल्यास प्रवाशांना एका दिवसात कामे पूर्ण करून परत येणे सोयीचे ठरणार आहे. आगामी काळात या सर्व योजनांमुळे जळगाव विमानतळ प्रादेशिक स्तरावर महत्त्वाचे हवाई केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here