Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगअहमदाबाद-जळगाव विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव विमानतळावर खळबळ…

अहमदाबाद-जळगाव विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव विमानतळावर खळबळ…


जळगाव समाचार डेस्क| ३१ ऑक्टोबर २०२४

अहमदाबादहून जळगावला येणाऱ्या पहिल्याच विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने विमानतळावर खळबळ उडाली. मंगळवारी रात्री जळगाव विमानतळावर लँड झाल्यानंतर या विमानाची तातडीने बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही, त्यामुळे प्रवाशांसह सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने विमान कंपनी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलाइंस एअरने अहमदाबाद-जळगाव सेवा मंगळवार, २९ ऑक्टोबरपासून सुरू केली असून, मंगळवारी या सेवेचा पहिलाच दिवस होता. अहमदाबादहून जळगावला रात्री साडेआठच्या सुमारास येणाऱ्या या विमानात बॉम्ब असल्याचा संदेश विमानतळ प्रशासनाला मिळाला. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

विमान लँड होताच, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक निरीक्षक गणेश वाघ व इतर पोलीस अधिकारी आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. विमानातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून विमानाची कसून तपासणी करण्यात आली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तपासणीत कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही, याची खात्री झाल्यानंतर प्रवाशांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या घटनेने जळगाव विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देशभरात अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page