जळगाव समाचार | १ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरातील महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील नियोजनशून्य कारभार आणि तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. संगणक आणि मनुष्यबळ उपलब्ध असूनही दाखले वितरणात होत असलेली दिरंगाई नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना रांगेत दिवसभर थांबूनही दाखले न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागत आहे. शाळा, महाविद्यालये तसेच आधारकार्ड अपडेटसाठी आवश्यक असलेल्या क्यूआर कोडयुक्त जन्मदाखल्यांची मागणी वाढली असतानाही विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
विभागात दोन संगणक उपलब्ध असले तरी प्रत्यक्षात फक्त एका संगणकावरूनच दाखले दिले जात आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावून रांगा वाढतात आणि नागरिकांचा तासन्तास वेळ वाया जातो. दाखल्यांचे वितरण केवळ सकाळी ११ वाजेपर्यंतच टोकन पद्धतीने केले जाते. सकाळी १० ते ११ दरम्यान टोकन वाटले जातात आणि त्या टोकनधारकांनाच दिवसभरात दाखले मिळतात. मात्र ११ नंतर येणाऱ्या नागरिकांना “उद्या या” असे सांगून परत पाठवले जाते. परिणामी, बाहेरगावाहून आलेल्या लोकांना पुन्हा पुन्हा चकरा माराव्या लागत आहेत.
“संगणक प्रणाली असूनही एवढा विलंब का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पुरेसे मनुष्यबळ व साधनसामग्री असूनही निष्काळजीपणा आणि नियोजनशून्य कारभारामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विभागाच्या या कारभारावरून नागरिकांमध्ये संताप उसळला असून तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे.