जळगाव समाचार | २३ ऑक्टोबर २०२५
स्मार्टफोन प्रेमींसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. एप्पल कंपनीने आयफोन १८ ची स्टँडर्ड मॉडेल २०२६ मध्ये लॉन्च करण्याची योजना रद्द केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याचा अर्थ, पुढील वर्षी होणाऱ्या एप्पलच्या वार्षिक सप्टेंबर इव्हेंटमध्ये बेस मॉडेल दिसणार नाही. कंपनीने आपल्या फोकसमध्ये मोठा बदल करत प्रीमियम सेगमेंटवर भर देण्याचे ठरवले असून, पहिल्यांदाच फोल्डेबल आयफोन बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. हे पाऊल एप्पलच्या पारंपरिक लॉन्च स्ट्रॅटेजीमध्ये मोठा बदल मानला जात आहे.
एप्पलच्या नव्या योजनांनुसार, २०२६ पासून आयफोन सीरीज दोन टप्प्यांत सादर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात (सप्टेंबर २०२६) आयफोन १८ प्रो, प्रो मॅक्स, एअर आणि फोल्डेबल आयफोन या प्रीमियम मॉडेल्सचा समावेश असेल, तर दुसऱ्या टप्प्यात (मार्च २०२७) आयफोन १८ ची बेस मॉडेल आणि आयफोन १८ई हे बजेट व्हर्जन लॉन्च केले जाणार आहेत. कोरियन मीडिया ETNews, MacRumors आणि The Information यांसारख्या विश्वसनीय माध्यमांनी ही माहिती दिली असून, एप्पलने आपल्या सप्लायर्सना नव्या उत्पादन वेळापत्रकाबाबत सूचित केले आहे. फोल्डेबल आयफोनचा बुक-स्टाइल डिझाइन, ७.८-इंच आतील आणि ५.५-इंच बाहेरील डिस्प्ले, तसेच टायटेनियम फ्रेम अशी वैशिष्ट्ये असतील.
एप्पलने हा निर्णय विक्रीत झालेल्या मंदीमुळे घेतल्याचे सांगितले जात आहे. चीन आणि युरोपमध्ये विक्री घटल्याने कंपनीला प्रीमियम मॉडेल्समधून जास्त नफा मिळवण्यावर भर द्यावा लागत आहे. तसेच, २०२७ मध्ये आयफोनच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी “आयफोन १९” वगळून थेट “आयफोन २०” लॉन्च करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या बदलामुळे बेस मॉडेल्सच्या ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागेल, मात्र फोल्डेबल आणि एआय-आधारित नव्या फीचर्समुळे दीर्घकालीन विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात एप्पल बेस मॉडेल्सचे उत्पादन वाढवणार असल्याने देशासाठीही ही महत्त्वाची संधी ठरू शकते.

![]()




