शालार्थ ID घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप नेते संजय गरूड जेरबंद…

 

जळगाव समाचार | २८ जुलै २०२६

राज्यभर गाजत असलेल्या बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा भाजप नेते संजय गरूड यांना अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याने शैक्षणिक व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी काही संस्थाचालक व शिक्षण अधिकारी एसआयटीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गरूड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा संशय आहे. या संशयास्पद आयडींच्या आधारे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने एसआयटीने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत असलेल्या गरूड यांना अखेर नातेपुते येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले.

यापूर्वी या प्रकरणात माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर संजय गरूड यांच्यावरील कारवाई ही तपासातील दुसरी मोठी आणि महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. गरूड यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या घोटाळ्याच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संजय गरूड हे जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून त्यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढविली. ३० जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here