जळगाव समाचार | १४ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात हॉटेल रूपाली बाहेरील अनेक वर्षांपासून लावण्यात आलेल्या विनापरवानगी होर्डिंग प्रकरणी अखेर महानगरपालिकेने मोठी कारवाई करत दंडात्मक नोटिसा बजावल्या आहेत. उपायुक्त (महसूल) धनश्री शिंदे यांनी जारी केलेल्या दोन स्वतंत्र नोटिसांद्वारे मनपाने २०x२५ फिट आणि १०x८ फिट LED डिस्प्ले या दोन्ही स्ट्रक्चर्सवर परवानगीशिवाय जाहिरात लावल्याबद्दल एकूण ₹६०,१८० दंड आकारला आहे.
मनपाच्या तपासात गेल्या वर्षी २२ जुलै २०२४ रोजी पहिली नोटीस देऊन परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, निर्देश न पाळल्याने पहिल्या स्ट्रक्चरवर ₹२०,०६० दंड तर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आढळलेल्या LED डिस्प्लेवर ₹४०,१२० दंड आकारण्यात आला. तसेच दोन्ही स्ट्रक्चर्स २४ तासांत स्वतःहून हटविण्याचे आदेश देत, अन्यथा मनपा हातोडा चालवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मनपाने पुढे स्पष्ट केले की वादळ वा दुर्घटनेमुळे जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे जाहिरात धारकावरच राहील.
दरम्यान, या प्रकरणात तक्रार करणारे ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. “सदर होर्डिंग गेली अनेक वर्षे तिथे असूनही मनपाने माजी महापौरांच्या दबावाखाली येत केवळ १७ महिन्यांचा दंड आकारून प्रकरणाला पळवाट काढली,” असा आरोप त्यांनी केला. तसेच ते उद्या उपायुक्तांची भेट घेऊन संपूर्ण बाब मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे स्वातंत्र्य चौकातील अनधिकृत जाहिरात स्ट्रक्चर्सवरून मोठी खळबळ उडाली आहे.

![]()




