जळगाव समाचार | १४ ऑक्टोबर २०२५
अमरावतीत सोने विक्री करून परतणाऱ्या जळगावच्या सराफा व्यापाऱ्याचे तब्बल २ किलो ३०० ग्रॅम (सुमारे २ कोटी ११ लाख ८२ हजार रुपये किमतीचे) सोने धावत्या ट्रेनमधून चोरीला गेले. ही धक्कादायक घटना रविवारी (१२ ऑक्टोबर) सायंकाळी बडनेरा रेल्वे स्टेशनवर हावडा–मुंबई मेल एक्सप्रेसमध्ये घडली. चोरी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव किशोर ओमप्रकाश वर्मा (वय ४४, रा. जळगाव) असे असून, त्यांनी तत्काळ जीआरपीकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी (१३ ऑक्टोबर) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर वर्मा हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे स्थानिक सुवर्णव्यावसायिकांना सोने दाखवण्यासाठी रविवारी सकाळी जळगावहून आले होते. त्यांनी दिवसाभरात सुमारे १९८ ग्रॅम सोने विकले, तसेच आणखी काही व्यापाऱ्यांशी भेट नियोजित होती. मात्र, काही कारणांमुळे व्यवहार न झाल्याने उर्वरित अडीच किलो सोने घेऊन ते संध्याकाळी परत जळगावकडे निघाले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांनी बडनेरा स्टेशनवरून हावडा-मुंबई मेलच्या जनरल कोचमध्ये प्रवेश केला. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने ते दरवाज्याजवळील बेसिन जवळ उभे होते. याच दरम्यान त्यांनी सोन्याची बॅग वरच्या लगेज रॅकमध्ये ठेवली, आणि काही क्षणांतच ती बॅग अज्ञात चोरट्याने उचलून नेली, हे त्यांना कळलेच नाही.
घटनेनंतर रेल्वे पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी चार विशेष पथके विविध दिशांनी रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मते ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव आणि अमरावतीतील सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली असून, दिवाळीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीदरम्यान व्यापाऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तांत्रिक साधनांच्या मदतीने तपासाला गती दिली असल्याचे जीआरपीचे निरीक्षक मुंढे यांनी सांगितले.