जळगाव समाचार | ६ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरातील प्रतिष्ठित समजले जाणारे जी. एच. रायसोनी महाविद्यालय सध्या ‘युवारंग’ महोत्सवाच्या तयारीत व्यस्त असले तरी, दुसरीकडे कॉलेजच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर काळे ढग दाटले आहेत. पुण्यातील नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये रायसोनी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन भविष्याची कास धरलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे नाव ऐकून थेट बाहेर हाकलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अवघ्या काही दिवसांत युवारंगच्या रंगतदार कार्यक्रमांना सुरुवात होणार असतानाच ही घटना उघड झाल्याने कॉलेज प्रशासनावर पालकवर्गातून टीकेची झोड उठली आहे.
नामांकित कंपनीतून हाकलले जळगावचे विद्यार्थी
पुण्यातील एका सुप्रसिद्ध कंपनीच्या प्लेसमेंट टेस्टसाठी जळगाव रायसोनी कॉलेजमधील विद्यार्थी गेले होते. मात्र, तिथे पोहोचताच संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले —
“ही टेस्ट जळगावच्या रायसोनी कॉलेजसाठी नाही, फक्त नागपूर आणि पुणे शाखांसाठी आहे. तुमचे कॉलेज प्रशासन तुम्हाला का पाठवते, हे आम्हालाच कळत नाही.”
या उत्तरामुळे विद्यार्थ्यांची तीव्र नामुष्की झाली. त्यांनी तत्काळ कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला असता, “दहा मिनिटांत तोडगा काढतो,” असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर प्रशासनाकडून फोन घेणेच बंद करण्यात आले, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्याला धमकावल्याचा आरोप
या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांपैकी एकाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून कॉलेजच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला. मात्र त्यानंतर त्याच विद्यार्थ्याला कॉलेज प्रशासनाकडून “व्हिडिओ डिलीट कर, अन्यथा तुझ्या प्लेसमेंटवर परिणाम होईल,” अशा धमक्या दिल्याचे समजते.
विद्यार्थ्यांचा मनस्ताप, पालकांचा रोष
लाखो रुपयांची फी भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या फसवणुकीला सामोरे जावे लागणे ही शिक्षण क्षेत्रातील लज्जास्पद बाब असल्याचे पालक म्हणत आहेत.
“युवारंगच्या चमकदार झगमगाटामागे विद्यार्थ्यांच्या आशा, अपेक्षा आणि करिअरचा खेळ चाललाय का?” असा संतप्त सवाल विद्यार्थीवर्गातून उपस्थित होत आहे.
एका बाजूला ‘युवारंग’च्या डंकेदार तयारीचा गजर, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा रायसोनीचा भोंगळ कारभार या विरोधाभासाने जळगावच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
दरम्यान, लाखो रुपयांची फी भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या फसवणुकीला सामोरे जावे लागणे ही शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या बेपर्वा कारभारावर आता पालक व विद्यार्थीवर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.