शहरातील कांचननगरात रात्री गोळीबार; एक ठार, दोन जखमी!

 

जळगाव समाचार | १० नोव्हेंबर २०२५

शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १० वाजता दोन गटांमध्ये झालेल्या पूर्ववैमनस्यातून वाद चिघळला आणि थेट गोळीबार झाला. या हल्ल्यात आकाश युवराज बाविस्कर (वय २८) जागीच ठार झाला, तर गणेश सोनवणे (२६) आणि तुषार सोनवणे (२६) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.

काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी टोळ्यांची दहशत वाढत असल्याची चर्चा असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक पूर्ववैमनस्यातून सुरू झालेल्या भांडणाला चिथावणी मिळाल्यानंतर ते थेट गोळीबारापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे. मृत आणि जखमी तिघेही कांचननगरचे रहिवासी असल्याने परिसरात मोठी गर्दी जमली होती.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी तातडीने धाव घेतली. चौकशीत गोळीबार करणारे दोघे संशयित ओळख पटल्याची माहिती मिळत असली तरी पोलिसांनी अधिकृत तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. एलसीबीची टीमही संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली असून प्राथमिक चौकशीत हा हल्ला लाडू गँगशी संबंधित टोळक्याकडून केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनेनंतर आरोपींचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here