जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून गोळीबार; जुन्या बसस्थानकासमोर महिलेवर जिवघेणा हल्ला…

 

जळगाव समाचार | २१ ऑक्टोबर २०२६

दसऱ्याच्या रात्री जळगाव शहरातील जुन्या बसस्थानकासमोर गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. भावाच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणावरून अनिकेत मधुकर सपकाळे याने आपल्या साथीदारासह गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, तिच्या डाव्या पायाला गुडघ्याजवळ गोळी लागली आहे. जखमी महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अनिकेत सपकाळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला जळगाव शहरातील गोपाळपुरा परिसरात राहते. ती जैन इरिगेशन कंपनीत मजुरी करून आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करते. गेल्या तीन वर्षांपासून तिचे सोनीनगर, पिंप्राळा येथील रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, रोहनचा भाऊ अनिकेत याचा या संबंधांना विरोध होता. याच कारणावरून दोन दिवसांपूर्वी सपकाळे कुटुंबात वाद झाल्याचे सांगण्यात येते. या वादानंतर रोहन घराबाहेर राहत होता.

मंगळवारी (दि. २०) रात्री रोहन आणि संबंधित महिला मेहरुण ट्रॅक परिसरात रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. या दरम्यान अनिकेत रोहनला वारंवार फोन करून तो कुठे आहे, याची विचारणा करत होता. कार्यक्रमानंतर मध्यरात्री साडेबारा ते पावणेएकच्या सुमारास रोहन आणि महिला जेवणाचे पार्सल घेण्यासाठी दुचाकीवरून टॉवर चौकाकडून गोपाळपुराच्या दिशेने जात होते. ते जुन्या बसस्थानकासमोर आले असता, अनिकेत एका साथीदारासह दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागे आला.

जुन्या बसस्थानकासमोर दोघांना गाठल्यानंतर अनिकेतने महिलेला शिवीगाळ केली आणि दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात एक गोळी महिलेच्या डाव्या पायाला गुडघ्याजवळ लागली. ती जखमी होऊन रस्त्यावर कोसळली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. रोहनने तत्काळ जखमी महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे अनिकेत मधुकर सपकाळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दसऱ्याच्या रात्री जुन्या बसस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रेमसंबंधातील वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि गोळीबारासंबंधीचे इतर तपशील पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here