जळगाव समाचार | १३ जानेवारी २०२६
जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजेच १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून प्रचारबंदी लागू होणार आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार निवडणूक काळात कोणताही दबाव, गैरप्रकार किंवा अपप्रचार होऊ नये, यासाठी प्रचारबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रचारबंदीच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया तसेच इतर कोणत्याही माध्यमातून जाहिरात, प्रसिद्धी किंवा प्रचारात्मक मजकूर प्रसारित करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.
यासंदर्भात माहिती देताना जळगाव शहर महानगरपालिकेचे निवडणूक अधिकारी तथा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले की, लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सर्वांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

![]()




