जळगाव समाचार | १५ डिसेंबर २०२५
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता महापालिका निवडणुकांकडे वळले आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, तर २ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. ३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
या महापालिका निवडणुकीत राज्यभरातील ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये १ कोटी ८१ लाख ९३ हजार ६६६ पुरुष, १ कोटी ६६ लाख ७९ हजार ७५५ महिला, तर ४,५९० इतर मतदार आहेत. यासाठी राज्यात ३९,१४७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
राज्यातील २९ महापालिकांमधील एकूण २,८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आरक्षणनिहाय जागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे — महिला राखीव १,४४२, अनुसूचित जाती ३४१, अनुसूचित जमाती ७७, तर नागरिकांचा मागासवर्गातून ७५९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

![]()




