जळगाव समाचार | ११ डिसेंबर २०२५
जिल्ह्यात स्थगितीमुळे पुढे ढकललेल्या सहा नगर परिषदांच्या १२ प्रभागांसाठी २० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांसाठी बुधवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत पूर्ण झाली. एकूण ५८ अर्जांपैकी छाननीत ११ अर्ज बाद झाले होते, तर उर्वरित ४७ पैकी सात उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे आता एकूण ४० उमेदवार निवडणूक मैदानात कायम राहिले आहेत. गुरुवारी चिन्हवाटपासह अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, २० तारखेला आवश्यकता असल्यास मतदान पार पडेल व दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होईल.
या १२ प्रभागांमध्ये अमळनेरचा प्रभाग १-अ, सावदा येथील २-ब, ४-ब व १०-ब, यावलचा ८-ब, वरणगावचा १०-अ व १०-क, पाचोरा येथील ११-अ व १२-ब, तसेच भुसावळमधील ४-ब, ५-ब आणि ११-ब या प्रभागांचा समावेश आहे. न्यायालयीन स्थगिती उठल्यानंतर सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. अर्ज माघारीनंतर विविध प्रभागांत दोन ते दहा अशा संख्येने उमेदवार आता स्पर्धेत राहिले आहेत.
दरम्यान, भुसावळमधील प्रभाग ५-ब, सावदा येथील २-ब आणि १०-ब या तीन प्रभागांतील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवाराच्या माघारीनंतर भाजप उमेदवार परीक्षित बऱ्हाटे यांचा निर्विरोध विजय निश्चित झाला. अपील प्रलंबित असलेल्या या जागेवरील हा निकाल भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात असून, नगरपरिषदेत पक्षाची ताकद आणखी वाढल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
उर्वरित प्रभागांमध्ये वरणगावच्या १०-अ मध्ये सात, १०-क मध्ये चार, पाचोऱ्यातील ११-अ मध्ये दोन आणि १२-ब मध्ये तीन, भुसावळच्या ४-ब मध्ये दहा व ११-ब मध्ये चार, अमळनेरच्या १-अ मध्ये तीन, तर यावलच्या ८-ब मध्ये दोन उमेदवार राहिले असून २० डिसेंबरच्या मतदानासाठी राजकीय वातावरण तापले आहे.

![]()




