जळगाव समाचार | २ डिसेंबर २०२५
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांशी संबंधित निकाल जाहीर करण्यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. उद्या होणारी मतमोजणी आणि निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवण्यात आली असून, आता हे सर्व निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केले जाणार आहेत. तसेच, या कालावधीत एक्झिट पोलही प्रसिद्ध न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
खंडपीठाने स्पष्ट केले की आजची मतदान प्रक्रिया पूर्वनियोजित पद्धतीने सुरू राहील आणि न्यायालयाच्या आदेशाचा तिच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, निकाल आणि मतमोजणीची प्रक्रिया 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
या आदेशामुळे संबंधित शहरांमध्ये आचारसंहिता लागूच राहणार आहे. निकाल जाहीर होण्याची तारीख पुढे सरकल्याने विविध पक्षांच्या तळांमध्ये अस्वस्थता आणि उत्सुकता वाढली आहे. आगामी 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी आणि निकाल घोषणेवर आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

![]()




