जळगाव समाचार | १४ जानेवारी २०२६
महापालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांना घरोघरी भेटी देऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली असली, तरी प्रचार साहित्य वाटपावर बंदी घालण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीच्या उमेदवारांकडून मतदार महिलांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार कैलास हटकर यांनी केला आहे. या आरोपासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आचारसंहितेच्या भंगाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अपक्ष उमेदवार कैलास हटकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष पाटील आणि माजी महापौर ललित कोल्हे यांच्या वतीने महिलांना रोख रक्कम दिल्याचा दावा केला आहे. तसेच प्रचारासाठी बोलावलेल्या महिलांना एका ठिकाणी डांबून ठेवल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या दोन्ही आरोपांशी संबंधित स्वतंत्र व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने प्रभागातील वातावरण अधिकच तापले आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकार निवडणुकीच्या काळात बदनामी करण्याच्या उद्देशाने घडवून आणले जात असल्याचा दावा केला. व्हायरल व्हिडिओतील महिला या बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या असून, त्यांना त्यांच्या कामाची मजुरी देण्यात येत होती, असा खुलासा त्यांनी केला. महिलांना टप्प्याटप्प्याने बाहेर सोडण्यामागे गोंधळ टाळण्याचा हेतू होता, मात्र त्याचा गैरसमज पसरवण्यात आला, असेही त्या म्हणाल्या. संपूर्ण प्रकरणावर निवडणूक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

![]()




