जळगाव समाचार डेस्क | ४ जानेवारी २०२५
येथील केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांचे वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या हिंदी नाटकाचे राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्लीअंतर्गत होणार्या भारंगम या आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. 28 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार्या महोत्सवात 4 फेब्रुवारी रोजी प्रतिशोध हे हिंदी नाटक सादर होणार आहे. दरम्यान संपूर्ण खान्देशातून केवळ केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र या संस्थेच्या नाटकाची निवड झाली असल्याने लेखक-दिग्दर्शक वैभव मावळे यांच्यासोबत संपूर्ण चमूवर रंगकर्मीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यासाठी कान्ह ललित कला केंंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, प्राचार्य एस. एन. भारंबे अन् केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी. बेंडाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्ली हे दरवर्षी भारंगम या नाट्य महोत्सवाचे आयोजन करीत असते. या नाट्य महोत्सवात महाराष्ट्र आणि भारतभरातून नाटकांचे सादरीकरण होत असते. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय महोत्सवात परदेशातूनही नाटके होत असल्याने या महोत्सवाचे एक वेगळे प्रस्थ बनलेले आहे. याचा एक भाग म्हणून वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या नाटकाचे सादरीकरण होणार असल्याने संपूर्ण खान्देशात केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्राने मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. हेमंत पाटील, दिनेश माळी यांनी मार्गदर्शन केले असून यासाठी किरणकुमार अडकमोल, सुदर्शन पाटील, सचिन महाजन, प्रा. प्रसाद देसाई यांनी परिश्रम घेतले आहेत.
या देशांचे होणार सादरीकरण –
या महोत्सवात जर्मनी, स्पेन, तैवान, श्रीलंका, पोलंड, ऑस्ट्रिया, नेपाळ या देशांचे सादरीकरण होणार असून यात भारतभरातून ओडिसा, कर्नाटक, नवी दिल्ली, मणिपूर, आसाम, बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुवाहाटी, पंजाब, गोवा, तेलंगणा, पटना, केरळ आणि जम्मू काश्मिर येथील नाटकेही सादर होणार आहेत.
या कलाकारांची उपस्थिती –
लोकेश मोरे, यश चौधरी, विश्वजीत कोळी, यश कल्याणी, सचिन सोनवणे, गोपाल मोरे, उमेश चव्हाण, नैना अग्रवाल, ज्योती पाटील, अश्विनी बेलेकर, हिमानी कोळी, हिमानी महाजन, धनश्री शिंपी, सिद्धी कुलकर्णी, जयेश वाणी, सिद्धांत सोनवणे हे विद्यार्थी या नाटकात काम करणार आहेत.
– राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीअंतर्गत भारंगम या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव येथील नाटकाची निवड झाल्याने मनस्वी आनंद होत आहे. कान्ह ललित कला केंद्राची ही विजयाची पताका अशीच फडकत राहत असल्याने यामुळे खान्देशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शशिकांत वडोदकर, संचालक कान्ह ललित कला केंद्र, जळगाव