Monday, January 13, 2025
Homeजळगाव ग्रामीणमतदारसंघाच्या विकासासाठी डॉ. संभाजीराजे पाटील यांची अपक्ष उमेदवारी…

मतदारसंघाच्या विकासासाठी डॉ. संभाजीराजे पाटील यांची अपक्ष उमेदवारी…

जळगाव समाचार डेस्क | ३० ऑक्टोबर २०२४

एरंडोल-पारोळा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून डॉ. संभाजीराजे पाटील इच्छूक असले, तरी शिंदे गटाने या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार देण्याचे ठरवले आहे. महायुतीतर्फे पारोळ्याचे अमोल चिमणराव पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. यानंतर, आपल्याला तिकीट न मिळाल्याने डॉ. संभाजीराजे पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी त्यांनी शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सोमवारी दुपारी डॉ. संभाजीराजे पाटील यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात एक भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे, शेतकर्‍यांप्रती आपल्या आस्थेची प्रतीती देत डॉ. पाटील यांनी बैलगाडीवरून ही रॅली काढली, ज्यामुळे मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या मनात त्यांनी वेगळी छाप निर्माण केली.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. संभाजीराजे पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात अपेक्षित विकास झालेला नाही. त्यांच्या मते, ही निवडणूक म्हणजे मतदारसंघातील परिवर्तनाची सुरुवात असून, विकासाची गंगा आणण्यासाठी आपला अपक्ष लढा महायुती आणि महाविकास आघाडीविरोधात आहे. “स्वच्छ चारित्र्य आणि विकासाचा ध्यास घेऊनच या निवडणुकीत उतरला आहे, आणि मतदारांचा कौल मिळून आपला विजय निश्चित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page

Jalgaon Samachar WhatsApp Group