जळगाव समाचार | २८ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (वय ६८) यांचे आज, शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. यवतमाळ जिल्ह्यातील धनज–माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव असून, अमरावती येथील वलगाव रोडवरील ‘मिर्झा एक्सप्रेस’ या निवासस्थानी ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज आणि महाजबी व हुमा या दोन कन्या असा परिवार आहे. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगाह कब्रस्थानात अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. मिर्झा यांनी अवघ्या अकराव्या वर्षी कविता लेखनास सुरुवात केली आणि १९७० पासून मंचावर सादरीकरणाला प्रारंभ केला. पुढील पाच दशकांत त्यांनी विदर्भ–मराठवाड्यातील साहित्य संमेलनांमध्ये अढळ स्थान मिळवत २० काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे, ‘मिर्झा एक्सप्रेस’ या लोकप्रिय काव्यमैफिलीचे त्यांनी तब्बल सहा हजारांहून अधिक सादरीकरण केले आहे. शेती, ग्रामीण जीवन, सामाजिक प्रश्न आणि राजकीय विसंगती यांवर नर्म–विनोदी शैलीत भाष्य करणे ही त्यांची खासियत होती. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षही राहिले असून वृत्तपत्रातील विविध स्तंभांतूनही त्यांनी लेखन केले.
वऱ्हाडी भाषेचे जतन आणि प्रसारात त्यांचे योगदान मोठे मानले जाते. ‘मोठा माणूस’, ‘सातवा महिना’, ‘उठ आता गणपत’, ‘जांगडबुत्ता’ अशा त्यांच्या अनेक कविता प्रचंड लोकप्रिय झाल्या असून ‘जांगडबुत्ता’ हा शब्द लोकप्रचलित करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. सर्वधर्मीयांना जवळ घेणारी त्यांची साधी, थेट आणि मानवी मूल्यांना साद घालणारी कविता रसिकांच्या मनात कायम कोरली गेली आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील काव्यक्षेत्रातील एक प्रभावी, खुमासदार आणि जनमानसाशी नाळ जुळवणारा आवाज कायमचा शांत झाला आहे.

![]()




