जळगाव समाचार डेस्क | ७ नोव्हेंबर २०२४
शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांनी कटिबद्धतेने आपली भूमिका मांडली. ७ नोव्हेंबर रोजी जळगावच्या आयएमए हॉल येथे शहरातील सर्व मान्यवर डॉक्टरांची बैठक पार पडली, ज्यामध्ये डॉ. पाटील यांनी डॉक्टरांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या उमेदवारीचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. अनुज पाटील यांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधताना सांगितले की, “डॉक्टरांवर आज अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आणि अग्निशमन दलाकडून मिळणाऱ्या त्रासामुळे, तसेच सरकारी नियमांच्या किचकट अटींमुळे रुग्णालये चालवणे आव्हानात्मक बनले आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विधानसभेत एक प्रभावी प्रतिनिधी असणे गरजेचे आहे, आणि माझी उमेदवारी त्याच उद्देशाने आहे.”
डॉ. पाटील यांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देत, त्यांची व्यथा आणि अडचणींना विधानसभेत आवाज मिळवून देण्याचे वचन दिले. “तुमचं मोल, तुमची सेवा, आणि तुमच्या संघर्षासाठी माझं संपूर्ण बळ असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली परिवर्तनाचा निर्धार मी केला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी, ‘एक नविन जळगाव, एक निर्धार डॉक्टरांसाठी…!’ या घोषवाक्याला आधार देत त्यांनी डॉक्टरांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील गाजरे, सचिव डॉ. अनिता भोळे यांच्यासह डॉ. अनिल पाटील, डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. सुनील नाहटा, डॉ. राजेश पाटील, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. सुधर्शन नवाल, डॉ. अजय सोनवणे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. नरेंद्र भोळे, डॉ. लीना पाटील यांसह शंभरांहून अधिक डॉक्टर उपस्थित होते.