जळगाव समाचार डेस्क | ६ फेब्रुवारी २०२५
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. करुणा धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप मान्य करत त्यांना दरमहा पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.
मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप सिद्ध झाले नसले तरी, त्यांना करुणा मुंडे यांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये आणि त्यांच्या मुलीला, शिवानी हिला, दरमहा 75 हजार रुपये पोटगी द्यावी लागणार आहे. तसेच, करुणा मुंडे यांना खटला लढण्यासाठी 25 हजार रुपये खर्च देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. ही रक्कम खटला सुरू झाल्यापासूनच्या काळासाठी द्यावी लागणार आहे.
न्यायालयाने मला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून मान्यता दिली आहे, असे सांगत करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. “माझे नाव करुणा शर्मा नाही, आता मी करुणा धनंजय मुंडे आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी या लढ्यासाठी मोठी किंमत मोजली असून, शेवटी “न्याय जिंकला” असेही त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाने हा आदेश फक्त आर्थिक मदतीसाठी दिला आहे. कथित हिंसाचारासंबंधी कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. धनंजय मुंडे यांनी लिव-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे यापूर्वीच मान्य केले आहे आणि त्याचाच आधार घेत हा निर्णय देण्यात आला आहे.
वृत्तवाहिन्यांनी जबाबदारीने आणि अचूक बातम्या द्याव्यात, तसेच कोणतीही दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करू नये, असेही सावंत यांनी सांगितले.
या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठा दबाव वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत मुंडे यांचा या निकालाविरोधात पुढील कायदेशीर पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

![]()




