जळगाव समाचार | १४ ऑक्टोबर २०२५
शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली आणि शतकाहून अधिक परंपरेचा वारसा लाभलेली जळगाव जिल्हा सहकारी बँकेची ऐतिहासिक “दगडी बँक” विक्रीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या ठाम विरोधानंतर बँकेच्या संचालक मंडळाला आपला निर्णय बदलावा लागला असून, हा दोन्ही नेत्यांच्या एकीचा विजय मानला जात आहे.
नवी पेठ येथील दगडी बँकेची इमारत विकण्याचा घाट जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने काही दिवसांपूर्वी घातला होता. या निर्णयाला बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र विरोध नोंदवला. “शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि परंपरेचे मोल पैशात मोजता येत नाही. दगडी बँक ही केवळ इमारत नाही, तर शेतकऱ्यांच्या भावनांचे प्रतीक आहे,” असे सांगत खडसे यांनी विक्रीचा निर्णय पुनर्विचारासाठी मागे घेण्याची मागणी केली. तसेच, या वास्तूची खरी बाजारभाव किंमत सुमारे ६५ कोटी रुपये असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, विरोधी पक्षाचे नेते असूनही खडसे यांच्या भूमिकेला शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही पाठिंबा दर्शविला. “शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या या ऐतिहासिक वास्तूला २५-३० कोटींना विकण्याची गरज काय? जिल्हा बँकेला पैशांची एवढी कडकी लागली आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सत्तारूढ महायुतीत असूनही, अजित पवार गटाच्या नियंत्रणाखालील संचालक मंडळावर दबाव वाढला.
या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दगडी बँकेची विक्री प्रक्रिया तात्पुरती थांबवून तिच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्विकासाबाबत समाधानकारक प्रस्ताव न मिळाल्यासच विक्रीचा विचार करण्यात येईल, असे बैठकीत ठरले.
बैठकीस आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, मेहताबसिंग नाईक, प्रताप पाटील, नाना पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
याच बैठकीत जिल्हा बँकेचे आप्पासाहेब जे.एस. पाटील सभागृह देखभाल अभावी बंद असल्याने ते बीओटी तत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आधीच्या २२० आणि नव्याने ३०० जागांच्या भरतीसाठी शासनाकडे परवानगी मागण्याचाही ठराव करण्यात आला.
दगडी बँकेच्या विक्रीवरील निर्णय मागे घेतल्याने जिल्हाभरातील शेतकरी आणि बँक ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.