सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; धरणगावात उपक्रम

 

जळगाव समाचार | ३१ जुलै २०२६

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या Cyber Warriors उपक्रमांतर्गत धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंची माहिती जाणून घेतली. संवादात्मक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना फेक लिंकवर क्लिक करण्याचे दुष्परिणाम, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही न देण्याचे महत्त्व, सोशल मीडिया खात्यांची सुरक्षितता, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, सायबर बुलिंगचे दुष्परिणाम तसेच मजबूत पासवर्ड वापरण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची उदाहरणे, संवादात्मक सादरीकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरांमुळे सत्र अधिक प्रभावी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांविषयीच्या अनेक शंकांचे निरसन करून सुरक्षित डिजिटल व्यवहारांची माहिती आत्मसात केली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी “We Are Cyber Warriors” ही सायबर सुरक्षा शपथ घेत सुरक्षित डिजिटल भारत घडविण्यासाठी स्वतः जागरूक राहण्याबरोबरच आपल्या कुटुंबीय व समाजातही सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सायबर वॉरियर्स उपक्रमाचे समन्वयक प्रा. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर वॉरियर्स साक्षी तानाजी पाटील आणि विद्या विशाल सोनवणे यांनी हे जनजागृती सत्र प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढून सुरक्षित डिजिटल समाज घडविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here